| मुंबई | प्रतिनिधी |
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस पाऊस विश्रांती घेईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात धडाक्यात आगमन झालेल्या मान्सूनचा प्रवास 30 मेनंतर ओसरणार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. नागपूर वेधशाळेचे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मेनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे मान्सूननं संपूर्ण विदर्भ व्यापायला 15 जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते. दरम्यान, पुढील दोन दिवसात पावसाचा प्रवास थंडावणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.