दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणार आरोग्य सेवा
। चिपळूण । प्रतिनिधी |
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी व कर्करोगाचे लवकर निदान सुलभ करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाकडून अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन 29पासून 31 मेपर्यंत चिपळूण तालुक्यामध्ये कार्यरत राहणार आहे.
ग्रामीण दुर्गम भागातील लोकांपर्यंत सेवा पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे वेळेवर निदान होऊन अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल. या व्हॅनमध्ये प्राधान्याने स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग यावर लक्ष केंद्रित केले जाईल. मे. मेडिऑन हेल्थकेअर यांच्याकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कॅन्सर व्हॅन प्राप्त झाली असून, यात दंत शल्य चिकित्सक स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशा व अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतीद्वारे व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ही व्हॅन 29 मे रोजी सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे, 30 मे रोजी उपजिल्हा रुग्णालय, कामथे, 31 मे रोजी ग्रामपंचायत, खेर्डी येथे दाखल होईल.
नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, कामथेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. असित नरवंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी केले आहे.