राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का! धनंजय मुंडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर

। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे राज्यात सत्तापालट झाला होता. शिवसेनेत उभी फूट पडली. या सगळ्यानंतर आश्‍चर्याचा धक्का म्हणजे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊ केले. यानंतरही धक्कादायक घटनांची मालिका थांबेल असे वाटले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच आणखी एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आटोपल्यानंतर सागर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास देवेंद्र फडणीवस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. याठिकाणी फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर धनंजय मुंडे हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु, सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटातील मानले जातात. 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर शपथ घेतली होती. तेव्हादेखील धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात होते. त्यामुळे आतादेखील काही नवीन राजकीय समीकरणांची नांदी होऊ घातली आहे का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

Exit mobile version