| श्रीवर्धन | माधवी सावंत |
बॅ. अंतुले यांनी समाजकारण करण्यासाठी राजकारण केले. रायगड जिल्ह्याचं अर्थकारण बदलून टाकणारे धाडसी व्यक्तीमत्व म्हणजे बॅ. अंतुले यांचं नाव आजही स्मरणात आहे. जिल्ह्याचा नाही तर देशाचा विचार करणारा नेता रायगड जिल्ह्याने दिला. त्यांनी कायमच जिल्ह्याच्या हिताची आणि विकासाची भूमिका घेतली. मात्र सध्याची परिस्थिती पाहता समविचारी व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. स्वतःच्या नाही तर देशाच्या हितासाठी सर्वांनी लढायचं आहे. रायगड जिल्ह्यातून याची मुहूर्तमेढ रोवूया आणि राज्यातच नाही तर देशात परिवर्तन घडवूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीवर्धन येथे केले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.27) पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, आ. रविंद्र वायकर, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील, माजी आ. मुश्ताक अंतुले, माजी आ. सुरेश लाड, जे.एम. म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील, काँग्रेसचे नेते आर.सी. घरत तसेच शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी सांगितले कि, सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचे वेगळे स्थान आहे. महाराष्ट्र बँकेने उल्लेखनीय कामगिरी या क्षेत्रात केली आहे. त्याच बरोबरीने रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापुर या जिल्हा बँकांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. बँकेची आर्थिक स्थिती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी बँकेचा एनपीए म्हणजेच अनुत्पादक मालमत्ता बघणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा बँकेचा एनपीए बघता या बँकेची स्थिती उत्तम असल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले. याशिवाय सर्र्वसामान्यांच्या अर्थकारणात सहकार क्षेत्र महत्वाची भूमिका पार पाडतं. त्यामुळे रायगड जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य, शेतकऱ्यांना नक्कीच पाठबळ मिळेल, असंही ते म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच माजी आ. मुश्ताक अंतुले यांनी बॅ. अंतुले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
श्रीवर्धन परिवर्तन होणार
बॅ. अंतुले यांनी कायमच समाजकारणाला महत्व दिलं. श्रीवर्धन घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. चुकीच्या माणसांना साथ देण्याची चुक झाली. मात्र श्रीवर्धनमध्ये येणाऱ्या काळात नक्कीच परिवर्तन होईल. मुश्ताक अंतुले आता पुन्हा आपल्याला वैभव उभं करायचं आहे, असे म्हणत आ. जयंत पाटील यांनी मुश्ताक अंतुले यांना बळ देणार असल्याचे स्पष्ट केले.
व्यक्ती नाही वृत्तीला विरोध
शिवसेना आणि शेकापचे यापूर्वी वाद, मतभेद होते. मात्र एवढी वर्ष गेल्यानंतर आम्ही एकत्र आलो. कारण तेव्हा जे असायचं त्यात व्यक्तिगत विरोध नसायचा, सुडाचं राजकारण नसायचं. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बॅ. अंतुले यांची देखील मैत्री होती. काही मुद्यांवर मतभेद असायचे पण वैयक्तिक पातळीवर शत्रूत्व नव्हतं. आता जे राजकारण सुरु आहे, ते विरोधक असो वा सोबती असेल, त्यालाही संपव असं चाललेलं आहे. आताच्या राजकारणात व्यक्तीला नाही तर सुडाचं राजकारण करणाऱ्या व्यक्तीला विरोध असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
अन् शरद पवारही झाले भावूक
श्रीवर्धनमधील या सोहळ्यात जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. इंडिया आघाडीचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण होते. म्हसळा, श्रीवर्धनमधील अनेक महिलांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी एका महिलेने पवार साहेब आम्हाला तुमच्यामध्ये आमचे अंतुले साहेब दिसतात, असे सांगताच शरद पवारही गहिवरले.
आरडीसीसीचे कामकाज नियमाने आणि शिस्तीने केले – पृथ्वीराज चव्हाण
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमात येण्याची ही तिसरी वेळ आहे. पवार आणि आमच्या कुटूंबातील पुर्वाश्रमीचे अनेकजण शेकापच्या विचारांचे आहेत. त्यामुळे शेकापसोबत एक वेगळे नाते आहे. रायगड जिल्हा बँकेचे काम आ. जयंत पाटील यांनी नियमांत राहून शिस्तीत केले. त्यांनी कधीही बँकेसाठी विशेष सूट मागितली नाही. जिल्हा बँकेचे काम कसे करावे, याचा आदर्श आ. जयंत पाटील यांनी घालनू दिला आहे.
जिल्ह्यात होणार लवकरच इंडिया आघाडीची सभा
इंडिया आघाडीने भाजपविरोधी रणशिंग फुंकले आहे. देशासमोरील संकट दुर करण्यासाठी सर्व पक्षांनी एकजूट केली आहे. रायगड जिल्ह्यात गद्दारांना जागा दाखविण्यासाठी लवकरच इंडिया आघाडीची सभा रायगड जिल्ह्यात घेणार असल्याचं उपस्थित नेत्यांनी सांगितलं.