। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील सत्ताधारी जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, तळा शहरातील 20 वर्षांचा रखडलेला विकास भरून काढीन असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.सुनील तटकरे यांनी तळा नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली.
आज ग्रामीण भागात असे कुठलेही गाव नाही वाडी नाही जिथे रस्त्यांचे जाळे विणलेले नाही. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तळा शहरासाठी अंबेली येथून पहिली पाणी योजना मंजूर करून आणली शहराचा विकास करायला अक्कल लागते, ती अक्कल आणि नियोजन सत्ताधारी शिवसेनेकडे नाही. आज ज्यांना शहर माहीत नाही ते प्रचार करण्यासाठी आले होते अशी बोचरी टीका उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांचे नाव न घेता तटकरे यांनी केली.
चंद्रकांत रोडे यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवत शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे तळा शहराची वाट लागली असल्याचे सांगितले. स्थानिक पुढारी केवळ ठेकेदारीतून मलिदा कसा मिळत असेल यावर लक्ष ठेऊन आहेत. पाण्याची गंभीर नियोजन असल्याने शहर सोडून लोक दुसर्या शहरात स्थलांतरित झाली आहेत तळा शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले.
तळ्यामध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेवर टीका
