| तळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याला फडणवीस सरकारमध्ये दोन मंत्रीपदे मिळालेली असतानादेखील तळा तालुक्याचा विकास रखडलेलाच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तळा शहरासह तालुक्यातील मूलभूत समस्या अद्यापही कायम असून, नेत्यांकडून तालुक्याच्या विकासासंदर्भातील आश्वासन हवेतच विरले असल्याचेही सद्यःस्थितीवरून दिसून येत आहे.
भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती मिळून सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभेच्या आदिती तटकरे व महाड विधानसभेचे भरत गोगावले या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यामुळे तळा तालुक्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेला होती. मात्र, नवीन विकासकामे करणे दूरच, ज्या कामाचे भूमीपूजन होऊन कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला आहे, त्या कामांनादेखील सुरुवात करण्यात आलेली नाही.
तालुक्यात कित्येक वर्षांपासून रखडलेले शासकीय विश्रामगृह, तळा पोलीस ठाणे इमारत, कृषी कार्यालय इमारत, नगरपंचायत इमारत, मच्छी मार्केट, डम्पिंग ग्राऊंड, मोदी तलाव सुशोभिकरण यांसह अनेक कामे अद्यापही प्रलंबित आहेत.तसेच एक कोटी एक्काहत्तर लाख रुपये मंजूर करून भूमीपूजन करण्यात आलेल्या तळा बसस्थानकाच्या कामालाही अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. निवडणुकीआधी आश्वासनांचा पाऊस पाडणार्या नेत्यांचे आश्वासन निवडणूक जिंकल्यानंतर मात्र हवेतच विरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली असली तरी सद्यःस्थितीत तळा तालुक्याच्या पदरी विकासाच्या दृष्टीने उपेक्षाच आली असल्याची खंत तळावासियांकडून व्यक्त केली जात आहे.