| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
धार्मिक स्थळांच्या नावावर मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करण्याचे काम केले जात असून, प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास रात्रीत उभी राहणारी ही स्थळं भविष्यात प्रशासनाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
सिडकोच्या भूखंडावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने सिडको आणि पालिका प्रशासन यांच्यात असलेल्या दरीचा फायदा घेत सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहेत. यामध्ये धार्मिक स्थळांचे प्रमाण मोठे आहे. पनवेल पालिका हद्दीतील सिडको वसाहतीत असलेल्या कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा फेस 1 फेस 2, खांदा वसाहत, रोडपाली तसेच, इतर वसाहतीदेखील अशाच रीतीने अतिक्रमण करण्यात येत आहे. हे करण्यासाठी सुरुवातीला मोक्याची ठिकाणी असलेले मोकळे भूखंड हेरले जातात त्यानंतर त्या ठिकाणी लहानसा चौथरा उभारून विशिष्ट धर्माच्या प्रतिकाची स्थापना केली जाते. त्यानंतर एखाद्या जाहीर धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करून आजूबाजूच्या मोकळ्या जागेत मंडप उभारण्याचे काम केले जाते. काही कालावधीनंतर दगड-विटांचे पक्के बांधकाम करून सद्यःस्थितीत करोडो रुपये किंमत असलेला संपूर्ण भूखंडच हडपण्याचा प्रकार करण्यात येत आहे.
ट्रस्टची स्थापना
एकदा का धार्मिक स्थळाची निर्मिती केली की त्यानंतर धर्मादाय आयुक्तालयाकडे संबंधित स्थळाच्या नावावर धार्मिक ट्रस्टची परवानगी मागण्यात येते.
राजकीय नेत्यांचे पाठबळ
बेकायदेशीरपणे उभ्या करण्यात येणार्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास याविरोधात स्थानिक राजकीय नेत्यांचे पाठबळ घेऊन कारवाईला विरोध केला जात असल्याने अतिक्रमण विरोधी पथकदेखील हतबल ठरत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातदेखील अतिक्रमण
धार्मिक स्थळाच्या नावावर प्रतिबंधित क्षेत्रातदेखील अतिक्रमण करण्यात येत आहेत.ज्यामध्ये कांदळवन क्षेत्राचादेखील समावेश असून, अतिक्रमण करणार्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सर्वच धार्मियांचा समावेश आहे.
धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता
सामाजिक, राजकीय अथवा व्यावसायिक हेतूने करण्यात येत असलेल्या या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली गेल्यास याला धार्मिक रंग देऊन तेढ निर्माण केली जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अशा प्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
हार्बर मार्गांवरील खान्देश्वर रेल्वे स्थानकाजवळील एका मोकळ्या भूखंडावर सध्या पालिका अथवा कोणत्याही विभागाची परवानगी न घेता धार्मिक स्थळ उभारण्याचे काम सुरु आहे. पालिकेच्यावतीने या ठिकाणी एकदा कारवाई करण्यात आली, मात्र त्यानंतरदेखील पुन्हा त्याच ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, धार्मिक स्थळ उभारण्यात आले आहे.
धार्मिक संघटनांचे नेते प्रतिक्रिया देण्यास अनुत्सुक
धार्मिक स्थळाच्या नावावर करण्यात येत असलेल्या अतिक्रमणाबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी जवळपास सर्व धर्माच्या संघटनांच्या नेत्यांशी संपर्क साधला असता सर्वच धर्मीय संघटनांचे नेते प्रतिक्रिया देण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून आले.
उभारण्यात आलेले धार्मिक स्थळ सिडकोच्या भूखंडावर असल्याने याबाबत कारवाई करण्याबाबतचे पत्र सिडको विभागाला देण्यात आले आहे.
– सदाशिव कवठे, अधिकारी, पालिका प्रशासन