इलेक्ट्रिक कटर वापरून जंगलतोड, पर्यावरणप्रेमी नाराज
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कळंब-पाषाणे या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या कडेला खाड्याचापाडा गावाच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात जंगलातील झाडे तोडण्यात आली आहेत. या झाडांची तोड इमारती बांधण्यासाठी झाले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याहून धक्कादायक म्हणजे, त्या भागातील सर्व झाडे ही इलेक्ट्रिक कटरचा वापर करून तोडण्यात आली आहेत. दरम्यान, वनविभागाने झाडे तोडण्यासाठी संबंधित शेतकर्याला परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली असून, वनविभागाने झाडे तोडताना पाहायला हवे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी गणेश पारधी यांनी केली आहे.
कळंब-पाषाणे-वांगणी या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यावर खाडेपाडा गावाच्या हद्दीत रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेले मोठे जंगल तोडण्यात आले आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरु आहे आणि त्यात इमारती बांधण्याची कामेदेखील आजूबाजूला सुरु आहेत. संबंधित जमिनीचे मालक असलेल्या शेतकर्याने अनेक वर्षे वाढवलेली झाडे तोडण्याची परवानगी कर्जत वनविभागाकडे मागितली होती. त्या जागेतील झाडांचा पंचनामा करून कर्जत वन अधिकारी खेडेकर यांच्या कार्यालयाने परवानगी दिली आहे. मात्र, त्यानंतर वनविभागाचे दुर्लक्ष झाल्यावर संबंधित शेतकर्याने ठेका दिलेल्या ठिकाणी चक्क इलेक्ट्रिक कटर याचा वापर करून झाडे तोडली आहेत. इलेक्ट्रिक कटरचा वापर करून झाडे तोडली तर त्या झाडांना पुन्हा फुटवा फुटत नाही, असा दावा पर्यावरणप्रेमी गणेश पारधी यांचा आहे.
दुसरीकडे या भागात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहात आहेत आणि त्यासाठी त्या जमिनीमधील जंगलाची तोड करण्यात आल्याची चर्चा या भागात ऐकायला मिळत आहे.तर, शेतकर्यांनी राखून ठेवलेली झाडे ही शेतकर्यांना उत्पन्न मिळावे म्हणून तोड करण्याची परवानगी वनविभाग देत असते. त्यामुळे त्या भागात सुरु असलेली जंगलतोड नक्की कशासाठी होती, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.