राष्ट्रवादीचे सरपंच न्यायासाठी शिवसेनेच्या दारी

स्वतःच्या नेत्यांवर अविश्‍वास ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पेण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे, जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादीचे, कोकणाचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार राष्ट्रवादीचे अशी मातब्बर मंडळी राष्ट्रवादीत असताना, या राष्ट्रवादीच्या सरपंचांनी स्वतःच्या नेत्यावर विश्‍वास न दर्शविता शिवसेनेच्या नवख्या आमदारावर विश्‍वास दर्शविला आहे. याचा अर्थ, राजकीय वर्तुळात खूप वेगळाच घेतला जात असल्याने, राष्ट्रवादीचे सरपंच न्यायासाठी शिवसेनेच्या आमदाराचे उंबरे झिजवत असल्याच बोलल जात आहे.
पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक क्षेत्र जेव्हापासून जाहीर झाले, तेव्हापासून दोन प्रवाह पहायला मिळाले आहेत. एक औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) च्या बाजूने, तर दुसरा औद्योगिक क्षेत्राच्या विरोधी. एक तिसरा प्रवाह आहे; तो म्हणजे, पाण्यात बसणार्‍या बगळ्यांचा. या प्रवाहाला फक्त स्वतःची पोळी भाजायची आहे. स्थानिक आमदारांनीदेखील औद्योगिक क्षेत्र व्हावा याला एका जाहीर बैठकीमध्ये दुजोरा दिला आहे. आणि, भविष्याचा विचार करता, औद्योगिक क्षेत्र होणे, न होणे हे शेतकर्‍यांच्या हातात आहे. मात्र, स्थानिक पुढारी स्वतःचे वर्चस्व दाखवण्यासाठी ना ना युक्त्या योजतात. आणि, मग ते तोंडावर पडतात.
वडखळच्या नाक्यावर राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणारे पाच सरपंच, यातील तीन सरपंच हे डोलवी औद्योगिक क्षेत्रांच्या कार्यक्षेत्रातील आहेत. या राष्ट्रवादीच्या सरपंचांनी स्वतच्या नेत्यावर विश्‍वास न दर्शविता शिवसेनेच्या नवख्या आमदारावर विश्‍वास दर्शविला आहे. एकंदरीत काय, राष्ट्रवादीत आलेल्या सरपंचांना एकतर प्रोटोकाल माहिती नसावा किंवा आमदार, पालकमंत्री, खासदारांपेक्षा शिवसेनेचे आमदार वजनदार वाटत असावे.
पेण तालुक्यातील गेल्या दोन प्रकारात पालकमंत्र्यांना व खासदारांना स्थानिक नेतेमंडळीने नामुष्की आणण्याचा प्रकार केला आहे. त्यामध्ये पेणचे मुख्यधिकारी आमदारांच्या मर्जीतील आले. दुसरी बाब म्हणजे, स्वतःच्या पक्षाचे बाहुबली सरपंच न्यायासाठी शिवसेनेच्या दारात गेले. या बाबीवरुन पेण तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version