जुलैच्या पहिल्या आठवड्यात एनडीआरएफ रायगडात

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; महाडमध्ये तळ ठोकणार विशेष पथक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच जीवित व वित्तहानीचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) रायगडमध्ये तैनात करण्यात येणार आहे. 1 जुलैपासून एनडीआरएफचे पथक रायगडमध्ये दाखल होणार असून, महाड येथे त्यांचा तळ असणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

रायगड जिल्ह्याने मागील काही वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. जून 2020 मध्ये ‌‘निसर्ग’ चक्रीवादळाने जिल्ह्याला मोठा फटका दिला होता. त्यानंतर जुलै 2021 मध्ये झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे महाडसह अनेक भागांत महापूर आला होता. याच काळात महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. त्या भीषण दुर्घटनेत एनडीआरएफच्या जवानांनी बचाव व मदतकार्य राबवत अनेकांना सुरक्षित स्थळी हलविले होते, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेऊन जखमी व मृतांना बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते.

यंदाही मान्सूनने रायगडमध्ये दमदार हजेरी लावली आहे. 23 जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत असला, तरी काही ठिकाणी बंधारे तुटणे, झाडे कोसळणे आणि लहान-मोठ्या दुर्घटना घडण्यास सुरुवात झाली आहे.

हवामानाचा अंदाज आणि मागील वर्षांच्या अनुभवाच्या आधारे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने यंदा पूर्वतयारीवर भर दिला आहे. विशेषतः दरडप्रवण आणि पूरग्रस्त भागांवर लक्ष ठेवण्यात येत असून, स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलीस दल यांच्याशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, एनडीआरएफचे 20 हून अधिक प्रशिक्षित जवान महाड येथे तैनात राहणार असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करता येणार आहे. त्यामुळे संभाव्य नैसर्गिक संकटाच्या काळात जिल्ह्याला मोठा आधार मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड प्रशासनाने सज्जतेचा इशारा दिला असून, नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version