| सुतारवाडी | वार्ताहर |
सध्या सुतारवाडी परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. तसेच, या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. रस्त्यावरील मोकाट गुरांना अपघात करून पलायन करणे, चोऱ्यांचे वाढते प्रमाण व भानगडी या गोष्टींचा विचार करून सुतारवाडी नाक्यावर पोलीस चौकी होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी खासदार सूनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांनी लक्ष घालून याठिकाणी चौकी उभारावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
कोलाड-सुतारवाडी मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे सुतारवाडी येथून हजारो लहान-मोठी वाहने सातत्याने धावत असतात. पुणे, कोल्हापूर, मिरज, लोणावळा, अहमदनगर, तसेच अन्य शहरांकडे जाण्यासाठी सातत्याने वाहन धावत असतात. विले भागाड परिसरामध्ये अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांसाठी कच्चामाल पुरविण्यासाठी अनेक अवजड वाहन या परिसरातून रात्रंदिवस ये-जा करत आहेत. रिकामी अवजड वाहने सुसाट वेगाने येत असतात. पूर्वी हेटवणे ते कुडली दरम्यान अनेक अपघात झालेले आहेत. अनेक गुरांना तसेच माणसांना उडून भयानक अपघात झालेले आहेत. अशावेळी गुन्हा नोंदवण्यासाठी दहा किलोमीटरचे अंतर कापून कोलाड येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना खूपच त्रास होत असतो. त्यामुळे येथे पोलीस चौकीची लवकरच व्यवस्था व्हावी, अशी पंचक्रोशीतील तमाम नागरिकांची मागणी आहे .






