पर्यटन विकासाकरिता प्रभावी मार्केटिंगची गरज- रघुजीराजे आंग्रे

अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेची मोटारसायकल रॅली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर पर्यटकांना खुणावत आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा ते चौल-रेवदंडा हा अष्टागराचा परिसर तर पर्यटनाच्या दृष्टीने नंदनवन आहे. आपल्याकडे पक्षीवैविध्य आहे. जगातील मराठीतील पहिला शिलालेख आहे. उत्तम किनारपट्टी आहे. सागरी किल्ले आहेत, मिश्रदुर्ग, गिरीदुर्भूग, दुर्ग आहेत. मिश्रशेतीचा प्रकार आहे, म्हणजे आपल्याकडे जिताडा पालन आहे. ते अख्ख्या कोकणात कुठेच होत नाही, ते या साडेतीन तालुक्यांत होतं. यांचा जर विचार केला तर आणि शासनाने सहकार्य केलं, आपण योग्य मार्केटिंग केलं तर पर्यटन क्षेत्रात हा परिसर खर्‍या अर्थाने उत्तुंग भरारी घेईल, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी केले.

पर्यटन व्यवसायाला अधिकाधिक गतिमान करण्यासाठी अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था धडपडत आहे. त्यामुळेच मंगळवार, 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेने आपण घेतलेल्या पर्यटन व्रताकडे समाज, सरकार आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, पर्यटनविषयक जागृती करण्यासाठी रहाटले ते अलिबाग समुद्रकिनारा मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या मोटारसायकल रॅलीचा समारोप अलिबाग येथे सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळी करण्यात आला. यावेळी रघुजीराजे आंग्रे बोलत होते. त्यांनी आपले अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेला यापुढेही सहकार्य राहील, असे आश्‍वासन दिले. याप्रसंगी प्रारंभी संस्थेचे खजिनदार, आवासच्या शिवांजली हॉलिडे होमचे अमीष शिरगावकर यांनी त्यांचे स्वागत केले, तर अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष, थळच्या सृष्टी फार्मचे मनोज घरत यांनी संस्थेची माहिती देऊन रॅलीचे महत्त्व विशद केले.

अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेची ही मोटारसायकल रॅली सकाळी 8.30 ते 11.30 दरम्यान मांडवा जेटी, रहाटले, सासवणे, आवास, चोंढी-किहीम, थळ, वरसोलीमार्गे अलिबाग अशी काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये 30 मोटारसायकल्स होत्या. त्यावरील पर्यटन व्यावसायिक पर्यटनवृद्धीबाबतच्या घोषणा देत होते. या रॅलीत अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष, थळच्या सृष्टी फार्मचे मनोज घरत, खजिनदार, उपाध्यक्ष, किहीमच्या साईराज कॉटेजचे राजाराम पडवळ, खजिनदार, आवासच्या शिवांजली हॉलिडे होमचे अमीष शिरगावकर, आगरसुरे येथील यलो हाऊसचे सुबोध राऊत, कोळगावच्या आमराई फार्मचे सुधीर पुरो, वरसोलीच्या पर्णकुटीचे शेखर पडवळ, भाल येथील सावली हट्स फार्मचे शीतल कोळी, किहीमच्या काशीस्मृतीच्या प्रियांका राऊत, साई सान्निध्यचे निनाद काठे, किहीमच्या साईसावली हॉलिजे होमचे हेमंत पेडणेकर, इंदिरा अतिथीगृहाचे नितीन नाईक, आशीर्वाद गेस्ट हाऊसचे सुधाकर राणे, शिवकृपा कॉटेजचे सुदिन नाईक, राधा हरी कॉटेजचे आल्हाद जाधव, अतिथी फार्म हाऊसचे रवींद्र संसारे, कृष्णज्योती कॉटेजचे आशीष शिरगावकर, धोकवड्याच्या हॉटेल कीर्तीचे कौस्तुभ भिंगार्डे, शान बीच रिसॉर्टचे गणेश पुरव व इतर सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Exit mobile version