| मुंबई | वृत्तसंस्था |
भारताचा अव्वल दर्जाचा भालाफेकपटू व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने अँडरसन पीटर्स व जूलियन वेबरसारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत करत पॅरिस डायमंड लीगच्या विजेतेपदास गवसणी घातली आहे. नीरजने डायमंड लीगच्या पॅरिस फेरीत त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
यंदाच्या पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत जूलियन वेबरने नीरजला कडवं आव्हान दिलं होतं. मात्र, नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटर भालाफेक करून त्याचं वर्चस्व सिद्ध केलं. या थ्रोमुळे नीरज सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. नीरजची आघाडी इतर कोणत्याही खेळाडूला मोडून काढता आली नाही.
या विजयासह नीरजने जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू जूलियन वेबरचा वचपा काढला आहे. कारण वेबरने डायमंड लीगच्या दोहा लेगमध्ये नीरजला पराभूत केलं होतं. मात्र पॅरिसमध्ये नीरजने वेबरला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली आहे.
जूिलियन वेबरने 87.88 मीटर थ्रो करून द्वितीय क्रमांक पटकावला. तर, ब्राझीलच्या लुइस मॉरिसियो दा सिल्व्हाने 86.62 मीटरपर्यंत भाला फेकून तिसरं स्थान पटकावलं आहे. मागील तीन स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच नीरजने वेबरचा पराभव केला आहे. सध्याच्या डायमंड लीग हंगामाचा अंतिम सामना 27-28 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडच्या झ्युरिक शहरांत खेळवला जाईल.
दरम्यान, डायमंड लीगच्या पॅरिस लेगमध्ये नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणाऱ्या अँडरसन पीटर्सने सर्वांना निराश केलं. या स्पर्धेत तो त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने 77.89 मीटरच्या थ्रोने सुरुवात केली. तसेच पाच प्रयत्नांमध्ये तो केवळ 80.29 मीटर लांब थ्रो करू शकला.







