नीरजचे अपेक्षित सुवर्णयश

महाराष्ट्राच्या पाटीलची उत्तम कामगिरी

| भुवनेश्‍वर । वृत्तसंस्था ।

ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकाची कमाई केली. याच क्रीडा प्रकारात कर्नाटकाचा डी. पी. मनू रौप्य, तर महाराष्ट्राचा उत्तम पाटील कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

कलिंगा स्टेडियम, भुवनेश्‍वर येथे बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत भालाफेकपटूंना उष्ण आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागला. याचा नीरजसह सर्व भालाफेकपटूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. 26 वर्षीय नीरजला केवळ 82.27 मीटर अंतरावरच भाला फेकता आला, पण त्याची ही कामगिरी सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुरेशी ठरली. मनू (82.06 मीटर) दुसर्‍या, तर उत्तम पाटील (78.39 मीटर) तिसर्‍या स्थानी राहिला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या किशोर कुमार जेनाची कामगिरी निराशाजनक ठरली. जेनाला अवघ्या 75.49 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गेल्या आठवड्यात दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटरच्या फेकीसह रौप्यपदक मिळवणार्‍या नीरजने फेडरेशन चषकात ऊर्जा वाचवून खेळण्याचा प्रयत्न केला. नीरजने तीन वर्षांच्या कालावधीनंतर मायदेशातील एखाद्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या तीन वर्षांत त्याने ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स, डायमंड लीग आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली. त्यामुळे तो मायदेशातील स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. नीरज आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम (89.94 मीटर) कामगिरीपासून बराच दूर राहिला, पण अन्य भालाफेकपटूंच्या तुलनेत त्याची कामगिरी सरस ठरली.

गेल्या काही वर्षांपासून युरोपात सराव करणार्‍या नीरजला भुवनेश्‍वर येथील उष्ण वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागला. तीन प्रयत्नांअंती तो तिसर्‍या स्थानी होता. मात्र, चौथ्या प्रयत्नात त्याने 82.27 मीटरच्या अंतरासह अग्रस्थान पटकावले. यानंतर त्याने पाचवा आणि सहावा प्रयत्न करणे टाळले. मनूने नीरजसमोर आव्हान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस त्याला 82.06 मीटर अंतरासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, नीरजच्या सहभागामुळे आयोजकांना स्पर्धास्थळी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवणे भाग पाडले. ‘पूर्वी मी सहजपणे सगळ्यांना भेटू शकत होतो. आता मात्र सुरक्षारक्षकांकडून लोकांना अडवले जाते. मला हे आवडत नाही. परंतु आता या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. मी केवळ स्पर्धेवर लक्ष केंद्रित करतो,’ असे नीरज म्हणाला.

स्नेहा, गुरिंदरवीर 100 मीटरमध्ये सर्वोत्तम
कर्नाटकाची एसएस स्नेहा आणि पंजाबचा गुरिंदरवीर सिंग यांनी फेडरेशन चषकातील 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. महिलांमध्ये स्नेहाने 11.63 सेकंद अशी वेळ नोंदवली. तमिळनाडूची गिरिधरानी रवी (11.67 सेकंद) आणि ओडिशाची सराबानी नंदा (11.76 सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. पुरुषांमध्ये गुरिंदरवीरने 10.35 सेकंदाच्या वेळेसह सोनेरी यश संपादन केले. 200 मीटर शर्यतीत ओडिशाचा अनिमेष कुजुरने सुवर्णयश मिळवले.

तीन वर्षांनंतर भारतातील स्पर्धेत सहभाग नोंदवल्याचा आणि सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहे. मात्र, मी माझ्या कामगिरीबाबत फारसा समाधानी नाही. येथील उष्ण वातावरणात भालाफेक करणे सोपे नव्हते. त्यामुळे मी चौथ्या प्रयत्नानंतर थांबायचे ठरवले. आता मी युरोपातील आणखी काही स्पर्धांत सहभाग नोंदवणार आहे. परंतु या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकपेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक राखण्याचा माझा प्रयत्न असेल.

नीरज चोप्रा
Exit mobile version