नगरपरिषदेने जनजागृती करण्याची आवश्यकता
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील मठाच्या स्मशानभूमीमध्ये श्रीवर्धन नगर परिषदेने गेल्या वर्षी गॅस शवदाहिनी बांधली आहे. पावसाळ्यामध्ये शहरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भरपूर पाऊस व वारा समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे प्रेत जाळणे कठीण होऊन बसते. अनेक वेळा लाकड ओली असतात व सध्या रॉकेल देखील उपलब्ध होत नाही. लाकडांच्या किमंती देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. लाकडांवरती प्रेत जाळल्या नंतर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धूर होतो व दुर्गंधी देखील पसरते. यासाठी नगर परिषदेने गॅस शव दाहीनी बांधली आहे.
गॅस शव दाहीनीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी खर्च देखील खूप कमी येतो. मात्र श्रीवर्धनमधील नागरिकांमध्ये गॅस शव दाहीनी वापरण्याबाबत अद्याप तरी जनजागृती झालेली पाहायला मिळत नाही. काही विशिष्ट समाजातील लोक गॅस शव दाहीनीचा वापर करतात. परंतू शहरातील नव्वद टक्के नागरिक लाकडांवरतीच प्रेत जाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गॅस शव दाहीनीचा उपयोग केल्यानंतर वारा व पाऊस याचा काही परिणाम होत नाही. तसेच त्या ठिकाणी प्रदूषण देखील टाळले जाते. मोठ्या शहरांमध्ये विद्युत शव दाहिनी किंवा गॅस शव दाहीनी याचाच वापर अंत्यविधीसाठी केला जातो.
शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने तिरडी बनण्याची प्रथादेखील बंद झाली आहे. बहुतांश समाजांनी ल्युमिनियम धातूच्या रेडिमेड तिरड्या बनवून आणलेल्या आहेत. प्रेत झाल्यानंतर प्रेताला खांदा देण्यासाठी देखील सध्या माणसं मिळत नाहीत. त्यामुळे अनेक जण टेम्पोचा वापर करताना पाहायला मिळतात. शहर पर्यटनाच्या दृष्टीने सध्या खूप नावारूपाला आलेल आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी या समुद्रकिनारीच आहेत. येणारे पर्यटक फिरायला व समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरतीच येत असतात. मात्र त्या ठिकाणी अंत्यविधी झाल्याचे पाहिल्यानंतर अनेक पर्यटकांना समुद्रकिनारी फिरणे अडचणीचे वाटते. तरी शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त गॅस शव दाहीनीचा वापर करावा. जेणेकरून प्रदूषण देखील कमी होईल व समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील अडचणीचे होणार नाही.
