28 कोटी 64 लाखांची तरतूद
। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीच्या नेरळ ग्रामपंचायत मधील नळपाणी योजना जुनी झली होती. त्यामुळे पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मुबलक स्वरूपात मिळत नव्हते, हि अडचण लक्षात घेऊन आ.महेंद्र थोरवे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला होता. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली असून त्यासाठी 28 कोटी 64 लाखांची तरतूद केली आहे.
नेरळ आणि ममदापुर ग्रामपंचायतची नळपाणी योजना 1998 मध्ये तयार झाली होती. तर 1999 मध्ये तत्कालीन आ.सुरेश लाड यांच्या आमदारकीच्या काळात तत्कालीन सरपंच आयुब तांबोळी यांच्या सरपंच पदाच्या काळात या नळपणी योजनेचे लोकार्पण झाले होते. साडेसात कोटींची नळपणी योजना वाढती लोकसंख्या आणि नेरळ मधील वाढते नागरीकरण लक्षात घेता नवीन मोठी नळपाणी योजना तयार करावी अशी मागणी नेरळ ग्रामपंचायतकडून आ.महेंद्र थोरवे यांच्याकडे केली होती. कालावधी संपलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी नेरळ तसेच ममदापुर ग्रापपंचायत आणि कोल्हारे ग्रामपंचायत मधील काही भागाला दिले जात आहे. 2017 पर्यंत मुदत असलेल्या नेरळ नळपाणी योजनेची मुदत संपताना नवीन योजना कार्यन्वित होणे आवश्यक असते.मात्र 2022 साल उजाडले तरी नेरळ नळपाणी योजनेची मंजुरी मंत्रालयात अडकली आहे.नवीन नळपाणी योजना मंजूर होण्याची शक्यता नाही आणि स्थानिक कमी दाबाने होणार्या पाण्यामुळे त्रस्त आहेत.
दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे ठाणे विभागीय मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे सदसय सचिव यांनी 5 एप्रिल 2022 रोजी नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली आहे. 28 कोटी 64 लाख रुपये खर्चाची नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर झाल्याबद्दल कर्जतचे आ.महेंद्र थोरवे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.







