ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी सतर्क तरीही चोरी कायम
। नेरळ। प्रतिनिधी।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतानादेखील पाण्याची चोरी सुरू आहे. दरम्यान, याबद्दल नेरळ ग्रामपंचायतकिडून ज्या दोन ठिकाणी व्हॉल्व खोलून पाण्याची चोरी केली जाते. त्या ठिकाणी लोखंडी लॉक लावण्याचे आणि टेहळणी ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीचे प्रशासक यांनी कर्मचार्यांना दिले आहेत.
नेरळ गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना 1998 मध्ये बनविण्यात आली होती. ही योजना नेरळ गावातील 36 हजार लोकसंख्येसाठी होती आणि त्या योजनेची मुदत 2016 मध्ये संपली. त्या योजनेची मुदत संपून आठ वर्षाचा काळ लोटला असून नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणार्या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नळपाणी योजना अपुरी पडत आहे. ते लक्षात घेवून जीवन प्राधिकरणकडून नवीन नळपाणी योजना मंजूर असून त्या योजनेचे काम सुरू आहे. नवीन नळपाणी योजनेचे काम करण्यासाठी मोहाची वाडी येथील एक जलकुंभ तोडण्यात आले आहे. त्या वेळेपासून नेरळ गावात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत कार्यालयावर दररोज महिला आणि ग्रामस्थ हे मोर्चा घेवून येत असतात.
नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व भागाला मोहाची वाडी येथे टेकडीवर असलेल्या जलकुंभामधून पाणी वितरित केले जाते. त्या टाकीतून पाणी सोडण्याचे नियोजन सकाळी सहा पासून सुरू होते आणि सायंकाळीपर्यंत पाणी सोडले जाते.त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग जलशुध्दीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी मोहाची वाडी येथे पाठवण्याचे काम करते. जेणेकरून दुसर्या दिवशी सकाळी सर्व भागाला पाणी वितरित करणे सोपे जावे, यासाठी पाणीपुरवठा विभाग सतर्क असतो. मात्र प्रशासकीय राजवटीत नेरळ ग्रामपंचायतीमधील कर्मचारी वर्ग आणखी सतर्क झाला असून पाणी पुरवठा बंद झाल्यावर देखील हे कर्मचारी रात्री सर्व व्हॉल्व तपासात असतात. नेरळमधील काही रहिवाशी हे पाण्याचे व्हॉल्व रात्रीच्या अंधारात सोडून आपल्या भागाला अधिकचे पाणी ओढून घेत असल्याची बाब कर्मचारी वर्गाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे पाणी कर्मचारी यांनी ही बाब प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांच्या कानावर घातली आहे.
पाणी पुरवठा वितरित करणार्या कर्मचार्यांना जकात नाका आणि तुलसी समोर असलेले पाण्याचे व्हॉल्व हे सोडून पाण्याची चोरी करीत आहेत. या दोन्ही व्हॉल्ववर चिंच आळी, मोडक नगर, तुलसी आणि बुर्हाणी पार्क या भागातील किमान 30 इमारती असून स्थानिकांची 200 हून अधिक घरे आहेत. या भागातील रहिवाशांना दिवसातून दोनवेळा पाणी मिळत असल्याचे आढळून आले आहे. रात्री अंधारात पाण्याचे व्हॉल्व उघडून पाणी चोरी सुरू असून त्याचा परिणाम पाण्याची मुख्य टाकी खाली होण्यावर होत आहे. त्यामुळे नेरळ पाण्याची चोरी रोखावी अशी मागणी होत आहे.
नेरळ ग्रामपंचायत करणार पोलिसात तक्रार
याप्रकरणी नेरळ ग्रामपंचायत आक्रमक झाली असून ग्रामपंचायत कडून तत्काळ पोलीस ठाण्याला तक्रार देण्याची तयार सुरू झाली आहे. दुसरीकडे त्या पाण्याची चोरी रोखण्यासाठी आसपास असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
कमी दाबाने पाणी आल्यावर त्या पाण्याची चोरी ही इलेक्ट्रिक मोटार यांचा वापर करून केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे आम्ही मोटार जप्त करून त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाला केली आहे.त्याचवेळी पाण्याचे व्हॉल्व उघडून रात्री पाणी सुरू करणार्या सर्वांवर कारवाई करावी यासाठी पोलिसात रीतसर तक्रार देत आहोत.
सुजित धनगर,
प्रशासक