एपीएमसीत पेटीला 17 हजार रु. दर
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात कोकणातील देवगड येथील हापूसच्या मुहूर्ताची पहिली पेटी दाखल होत असते. यंदा मात्र हापूस हंगामाला विलंब होणार असून कोकणातील केसर आंब्यांनी हापूसच्या आधीच मुहूर्त साधला आहे. सोमवारी (दि.6) एपीएमसी बाजारात केशर आंब्याची पाच डझनाची पहिली एक पेटी दाखल झाली आहे. या पहिल्या पेटीची 17 हजार रुपये दराने विक्री झालेली आहे.
दरवर्षी हापूस आंब्याची मार्चमध्ये आवक वाढण्यास सुरुवात होते तर जानेवारी-फेब्रुवारीपासून हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागते. मात्र, त्याआधी एपीएमसी बाजारात देवगड येथील हापूस बाजारात दाखल होत असतो. मागील वर्षी देवगड येथील शिंदे कुटुंबीयांनी 21 नोव्हेंबरला एपीएमसी बाजारात पहिली पेटी पाठवून मुहूर्त साधला होता. परंतु, यंदा हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी तसेच हवामान बदल आणि थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव यामुळे फळधारणा झाली नाही. तर, मोहोरही गळून पडला आहे. त्यामुळे यंदा बाजारात हापूस विलंबाने दाखल होणार आहे. मात्र, यावेळी हापूस आधीच कोकणातूनच केसर आंब्याने नंबर लावत आंबा हंगाम सुरु करण्याचा मान पटकावला आहे.
हापूस हंगामाचे स्वागत
सोमवारी देवगड तालुक्यातील वाघोटनमधील शेतकरी शकील मुल्ला यांनी आपल्या शेतातील केसर आंब्याची पाच डझनची पहिली पेटी बाजारात एन.डी. पानसरे अँड सन्स यांच्याकडे पाठवली होती. एपीएमसीत हापूसची पहिली पेटी दाखल होताच विधिवत पूजा करून हापूस हंगामाचे स्वागत केले जाते. यंदा केसर आंबा पहिला दाखल झाल्याने त्याची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच, या आंबा हंगामातील पहिल्या पेटीला 16 ते 17 हजार रुपये बाजार भाव मिळाला आहे. आठ-आठ दिवसांनी या केशर आंब्याची बाजारात आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली आहे.