| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नेरे ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच प्रकाश गोपाळ घाडगे यांना रायगड जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. याबाबतचा आदेश त्यांनी दिला आहे. सरपंच प्रकाश घाडगे यांनी महाराष्ट्र शासन वन खाते अशी नोंद दाखल असलेल्या मिळकतीमध्ये निवासी कारणासाठी अतिक्रमण केले होते. त्यामुळे त्यांचे सरपंचपद रद्द करण्याबाबतचा अर्ज नेरे येथील शंकर गोपाळ ठाकूर यांनी दाखल केला होता.
पनवेल तालुक्यातील नेरे येथील सर्वे नंबर 258 या गा. न. नं. सातबारा कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन वन खाते अशी नोंद दाखल असलेल्या मिळकतीवर प्रकाश घाडगे यांनी अतिक्रमण केले आहे. त्यावर बांधलेल्या घर क्रमांक 150 अ चे सद्यःस्थितीमध्ये कायदेशीर वारस हे प्रकाश घाडगे हे असल्याने त्यांनी वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे सरपंचपद रद्द करणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी ॲड. प्रल्हाद खोपकर, ॲड. सूरज रमेश म्हात्रे यांनी अर्जदारातर्फे काम पाहिले.







