| उरण | प्रतिनिधी |
नेरुळ ते उरणदरम्यान उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, उरण शहर या नव्याने वाढत असलेल्या शहरांमधील लोकवस्ती पाहता सकाळी आणि सायंकाळी कामानिमित्त प्रवासादरम्यान नव्याने सुरू झालेल्या नेरुळ ते उरण ट्रेनच्या फेर्या कमी पडत आहेत. प्रवास करणारा वर्ग हा नोकरदारपासून ते शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महिला आहेत. त्यासाठी सद्यःस्थितीत असणारी ट्रेन सुविधा कामाच्या वेळी कमी पडत आहे. अशा तक्रारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडे विविध विभागातील नागरिकांकडून आल्या. त्यानुसार त्यांनी नऊ डब्यांच्या जागी 12 डब्यांच्या ट्रेन चालू कराव्या आणि नेरूळ ते उरणदरम्यान ट्रेनच्या फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी केली आहे.
नेरूळ ते उरण रेल्वे फेर्यांमधील वेळेचे अंतर हे खूप जास्त आहे. कामाच्या वेळी त्याचा ताण येऊन नागरिकांना मुख्यत्वे करून महिलावर्ग आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या त्यामुळे संबंधित विभागाकडे मी पाठपुरावा सुरू केला आहे आणि लवकरच ही अडचण निकाली निघेल अशी मला आशा आहे, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.