आंबा बागायतदारांसाठी नवे संकट

थंडी गायब झाल्याने मोहोरावर परिणाम

| चिपळूण | प्रतिनिधी |

कोकणातील हापूस आंबा बागायतदारांसाठी हंगामी उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डिसेंबर-जानेवारी महिन्यात येणारा मोहोर. या काळात सलग कमी तापमान राहिल्यास मोहोर योग्य प्रमाणात येतो व टिकून राहतो. याच पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ‌’गुलाबी थंडी‌’ अचानक ओसरल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

वातावरणातील तापमान वाढल्याने मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, हापूस आंब्याच्या गुणवत्तापूर्ण मोहोरासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी किमान 14 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान सलग 21 दिवस आवश्यक असते. या थंड हवेमुळे झाडाची वाढ नियंत्रित राहते आणि फुलोऱ्यातील स्थिरता टिकते. मात्र रत्नागिरी परिसरात मागील पाच-सहा दिवसांपासून सकाळ-संध्याकाळची थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. दिवसाचे कमाल आणि किमान तापमान दोन्ही वाढल्यामुळे मोहोर कुजण्याची, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची तसेच मोहोर पूर्णपणे गळून पडण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत.

Exit mobile version