नवीन गॅस कनेक्शन महागले

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी 16 जून पासून घरगुती गॅस कनेक्शनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनसाठी सुरक्षा रक्कमेत कंपन्यांनी 750 रुपयांची वाढ केली आहे. पाच किलोंच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठीदेखील 350 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. त्याशिवाय, पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस रेग्युलेटरच्या दरात वाढ केली आहे. नव्या गॅस रेग्युलेटरसाठी 100 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. दरवाढीच्या नव्या निर्णयानंतर गॅस कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 2200 रुपये मोजावे लागणार आहे. याआधी 1450 रुपये द्यावे लागत होते. याचाच अर्थ 750 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय गॅस रेग्युलेटरसाठी 250 रुपये, पासबुकसाठी 25 आणि पाइपसाठी 150 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. नवीन एलपीजी गॅस जोडणी घेणार्‍या ग्राहकाला आता 3690 रुपये द्यावे लागत होते. त्याशिवाय दोन सिलेंडर घेणार्‍या ग्राहकाला 4400 रुपये द्यावे लागणार आहे. 1

उज्जवला लाभार्थींनाही फटका
पाच किलोच्या गॅस सिलेंडर सुरक्षा ठेवीसाठी आता अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. पाच किलोंच्या सिलेंडरसाठी आता 800 रुपयांऐवजी 1150 रुपये द्यावे लागणार आहेत. पंतप्रधान उज्जवला योजनेतंर्गत स्वयंपाका गॅस सिलेंडर घेणार्‍या ग्राहकांना झटका बसणार आहे. या ग्राहकांना आपल्या जोडणीवर दुसरा सिलेंडर हवा असल्यास त्यांना वाढलेली सुरक्षा रक्कम द्यावी लागणार आहे. ग्राहकांना नवीन जोडणीत लावण्यात येणार्‍या रेग्युलेटरसाठी 150 रुपयांऐवजी 250 रुपये मोजावे लागणार आहे.

Exit mobile version