रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत

जिल्हा रुग्णालयात आयसीयू, डायलिसिस, शस्त्रक्रिया कक्षांची सुविधा

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या नूतन सात मजली इमारतीला सीआरझेड परवानगी, ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा. रायगड जिल्हा रुग्णालयाच्या सात मजली नूतन इमारतीसाठी पर्यावरण समितीकडून सीआरझेड परवानगी मिळाल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. तब्बल 105 कोटी रुपयांचा खर्च शासनाने मंजूर केला असून, 300 बेडसह अत्याधुनिक यंत्रसामग्रीयुक्त रुग्णालय उभारले जाणार आहे.

आयसीयू, डायलिसिस सेंटर, नवजात बालक विभाग, अपघात विभाग, पाच शस्त्रक्रिया कक्ष, क्ष-किरण कक्ष, लाँड्री, पाककक्ष, तसेच चार लिफ्टसह सर्व सुविधा या नूतन इमारतीत उपलब्ध होणार आहेत. अलिबाग शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी कार्यालये समुद्रकिनाऱ्यालगत आहेत. जिल्हा रुग्णालयही समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सीआरझेड परवानगी न मिळाल्याने इमारत बांधकाम रखडले होते. अखेर पर्यावरण समितीच्या दुसऱ्या बैठकीत परवानगी मिळाल्याने अडथळे दूर झाले असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा
रायगड जिल्ह्यातील खेडेगावांपासून ते दुर्गम भागातील नागरिकांना गंभीर आजार, अपघात किंवा शस्त्रक्रियेसाठी नेहमी मुंबईकडे धाव घ्यावी लागत होती. नव्या इमारतीत 20 बेडचे आयसीयू, 16 बेडचे नवजात बालक विभाग, 20 बेडचे डायलिसिस सेंटर, अपघात विभागासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. जिल्ह्यातील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या खर्चात आणि वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे.
अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष
या नूतन इमारतीत पाच अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष उभारले जाणार असून यात अर्थो, जनरल, स्त्री-रोग, अथम तसेच एचआयव्ही आणि एचएसबी बाधितांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष असतील. यामुळे विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी नागरिकांना आता मुंबई, पुणे गाठण्याची आवश्यकता उरणार नाही. बांधकामाला गती मिळणार या कामाची जबाबदारी पुण्यातील अजवानी कंपनीला सोपवण्यात आली आहे. मार्च महिन्यात भूमिपूजन पार पडले असले तरी सीआरझेड परवानगी नसल्याने काम रखडले होते. आता पर्यावरण समितीकडून परवानगी मिळाल्याने लवकरच बांधकामाला वेग येणार आहे, असे कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी सांगितले. विद्यमान बांधकामे हटवली जाणार रुग्णालयाच्या जागेवर सध्या रक्तपेढी आणि ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत. ही दोन्ही बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. विशेषतः ग्रामीण व खेड्यातील रुग्णांना जीव वाचवण्यासाठी मुंबई गाठण्याची धडपड करावी लागणार नाही, हा या नूतन इमारतीचा सर्वात मोठा लाभ ठरणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारती जागेवर रक्तपेढी आहे. तसेच, ऑक्सिजन प्लांटही आहे. रक्तपेढी पाडण्याची निविदा काढण्यात आली. लवकरच बांधकाम पाडण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लांट ही एक-दोन दिवसांत काढण्याचे काम सुरू होणार आहे.

डॉ. निशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक

Exit mobile version