नेरळ रेल्वे स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला

महाव्यवस्थापकांच्या हस्ते होणार होते उद्घाटन

। नेरळ । प्रतिनिधी ।

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन स्थानकातील फलाट एकवर प्रवासी वर्गासाठी नवीन पादचारी पूल बनविण्यात आला आहे. या पादचारी पुलावरून प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. या पादचारी पुलाचे उद्घाटन मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांचे हस्ते जानेवारी अखेरीस होणार होते, मात्र महाव्यस्थापक यांचा नियोजित दौरा पुढे गेल्याने पूल कोणतेही औपचारिक उद्घाटन न होता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील मुंबई-पुणे मार्गावर नेरळ जंक्शन हे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाच्या मुंबई रेल कोर्पोरेशनकडून काम सुरु आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकातून कर्जत दिशेने जाणार्‍या उपनगरीय लोकल थांबतात त्या फलाट एकवर नवीन पादचारी पूल आणि स्काय वॉक बनविला गेला आहे. त्या स्काय वॉकचे तसेच, स्थानकांच्या मध्यभागी असलेल्या नवीन पादचारी पुलाचे उद्घाटन जानेवारी महिन्याच्या अखेरीस केले जाणार होते. त्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते होणार होते. मात्र, महाव्यवस्थापक यांचा नियोजित दौरा नेरळ स्थानकातील विकास कामे अपूर्ण असल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला असला तरी त्यांच्या हस्ते उदघाटन होणारा नेरळ स्थानकातील फलाट एकवरील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. नेरळ स्थानकातील फलाट एक वरील पादचारी पूल खुला करण्यात आल्याने प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. आता नेरळ स्थानकात एकाच वेळी दोन पादचारी पूल फलाट एकवर उपलब्ध झाले आहेत.

नेरळ स्थानकातील फलाट एकवर नवीन पादचारी पुलाच्या बाजूला उदवाहन उभारण्याचे काम सुरु आहे. तर याच फलाटावर मुंबई एन्डवर सरकता जिना उभारण्याचे कामदेखील सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात नेरळ स्थानकातील फलाट एकवर उतरलेला प्रवासी हा सरकता जिना, उद्वाहन आणि पादचारी पूल यांच्या माध्यमातून थेट स्काय वॉकवरून नेरळ मध्य रेल्वे पार्किंगमध्ये पोहचणार आहे.

Exit mobile version