महाराष्ट्रासाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार

विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
। मुंबई । वृत्तसंस्था ।
करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन मुळे संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण झाले असताना गुरुवारी केंद्र सरकारने दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती दिली आहे. यामुळे ओमायक्रॉनने भारतात प्रवेश केल्याचं स्पष्ट झालं आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. करोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. तसेच लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून, संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असेही केंद्रीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. यादरम्यान महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनीं केला. तसंच लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं. ते म्हणाले की, ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये फार दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. म्युकरमायकोसिसची जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं तसं यात काही नाही. लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

Exit mobile version