। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गळक्या स्वच्छतागृहाचे सांडपाणी एस.टी.बसेस उभ्या करण्याच्या जागेवर ओसंडून वाहात असल्यामुळे कोरोना काळापूर्वी या सांडपाण्यासाठी स्थानकाच्या आवारातच खणण्यात आलेल्या खड्डयावर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छतागृहाचे सांडपाणी गटाराला मिळण्यासाठी रयत विद्यामंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या प्रारंभी सिमेंटकाँक्रीटचा पाईप टाकून प्रयत्न करण्यात आले. मात्र, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काळात महामार्गालगतचे गटार फोडण्यात आल्याने त्याठिकाणी सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले. या डबक्यावरून राजकीय श्रेयवाद सुरू झाल्याने पुढे एस.टी.महामंडळाच्या स्वच्छतागृहाचे सांडपाणी स्थानकाच्याच आवारात शोषखड्डा खणून जिरविण्यास सुरूवात झाली.
रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या स्थानकामध्ये स्वच्छतागृहाची नवीन इमारत होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन नवीन स्वच्छतागृहाची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, या इमारतीसाठी सांडपाण्याच्या शोषखड्डयावरच जागा शोधण्यात आली असून जांभा दगडामध्ये ही इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन इमारतीचे सांडपाणी आता पुर्वीसारखे आता सर्व्हिसरोड झालेल्या पुर्वीच्या डांबरी महामार्गाकडे अथवा एस.टी.स्थानकामागील शेतजमिनीकडे सोडता येणार नसल्याने एस.टी.महामंडळाच्या महाड आगाराच्या वाहतुक नियंत्रकांनी पोलादपूर नगरपंचायतीकडे सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सुविधा अथवा सांडपाणीवाहिनी सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
परंतू, सध्या महामार्ग अंडरपासच्या खंदकातून जात असून पूर्वीचा डांबरी महामार्ग आता पूर्वेकडील सर्व्हिसरोड झाल्याने या सर्व्हिसरोडवरील गटारामध्ये सांडपाणी सोडल्यास ते लालमातीच्या जमिनीमध्ये मुरले जाऊन खंदकातील महामार्गावर बॉक्सकटींगमधील लालमातीसह कोसळण्याचा धोका असल्याने नवीन स्वच्छतागृहासाठीही स्थानकाच्या आवारातच मोठा खड्डा खणण्याची गरज निर्माण झाली आहे.