| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित, तसेच अनियमित होत असल्याने त्याचा येथील पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. त्यातच नागरी वस्तीतील मुस्लीम मोहल्ला, पंचशील नगर व वाल्मिकी नगर या भागातील ट्रान्सफार्मर बिघडल्याने संपूर्ण दिवसभर तेथील रहिवाशांना विजेअभावी त्रास सहन करावा लागला. महावितरणकडून या ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी किमान दोन दिवस लागू शकतात, असे सांगण्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी याठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात यावा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर सहाय्यक अभियंता सचिन आटपाडकर यांनी तात्काळ कारवाई करत पनवेल येथून नवीन ट्रान्सफार्मर मागविला असून, त्याच्या जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्यासोबत उप नगराध्यक्ष संतोष शेलार, गटनेते शिवाजी शिंदे, नगरसेविका रिझवाना शेख, नगरसेवक सोहेल महापुळे, सामाजिक कार्यकर्ते शुभम गायकवाड, आदी भिल्लारे, निखिल शिंदे, अमोल चौगुले यांसह मुस्लीम मोहल्ल्यातील अन्य नागरिक उपस्थित होते.
नगराध्यक्षांच्या प्रयत्नांतुन नवीन ट्रान्सफार्मरची सोय
