। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथील निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी संसद मंडळ, सांस्कृतिक विभाग व निवडणूक साक्षरता मंडळाच्या माध्यमातून अगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या अहवानानुसार नव मतदारांबद्दलचा संक्षिप्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयातच आय.टी. विभागाच्या विशेष सहकार्याने नुकतेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली.
डॉ. संदीप घोडके यांच्या संकल्पनेतून राज्यशास्त्र व निवडणूक साक्षरता मंडळ दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नव मतदारांची नोंदणी राबवत असते. परंतु, पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावेत या उद्देशाने हा विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील एकूण 360 दरम्यान मतदारांची नोंदणी यशस्वीपणे करण्यात आली. या नव मतदारांना मतदानाचा हक्क देणार्या, लोकशाही बळकट करणार्या व मतदानाची टक्केवारी वाढविणार्या अनोख्या उपक्रमाबद्दल उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम व नायब तहसीलदार अधिकारी वर्गाने महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंडळाचे कौतुक केले आहे.
नवमतदार नोंदणी संपन्न
