नातेवाईकांकडून डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप
| पेण | प्रतिनिधी |
पेण जिल्हा उपरुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणेच्या कथित अनास्थेचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सिझेरियनद्वारे जन्मलेल्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाळाची योग्य देखभाल झाली नाही, आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या, तसेच संबंधित डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी झाली नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने पेण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
जिते येथील शीतल प्रकाश पाटील यांची 26 ऑगस्ट रोजी पेण उपजिल्हा रुग्णालयात सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. त्यांनी एका छोट्या बाळाला जन्म दिला. मात्र, 28 ऑगस्ट रोजी बाळाची शुगर कमी झाल्याने त्याला पेण येथील महाजन दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळाला एक दिवस ठेवण्यात आले. उपचारानंतर बाळाची प्रकृती सुधारल्याचे सांगण्यात आल्याने 29 ऑगस्ट रोजी बाळाला पुन्हा पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रसूतीनंतर बाळाची योग्य प्रकारे देखभाल करण्यात आली नाही, तसेच रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
महत्त्वाचे म्हणजे, डॉ. आशिष मेश्राम हे रुग्णालयात उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून बाळाची एकही व्हिजिट झाली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दुसरीकडे, नर्स नीता चांदोरकर यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बाळाची तपासणी केली असता त्यावेळी बाळ व्यवस्थित असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे बाळाच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नातेवाईकांनी आपली संपूर्ण व्यथा मांडली. दरम्यान, डॉ. मेश्राम यांनी रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचे मान्य केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नवजात बाळाच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण काय, उपचारामध्ये काही हलगर्जीपणा झाला का, तसेच रुग्णालयातील उपलब्ध सुविधांचा अभाव या घटनेला कारणीभूत ठरला का, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. नवजात बाळाच्या मृत्यूसारख्या गंभीर घटनेनंतरही जर जबाबदारी निश्चित झाली नाही, तर पेण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास कसा राहणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
अधीक्षक बेजबाबदार; नातेवाईकांचा आरोप
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, नातेवाईक तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे अधीक्षक ज्ञानेश्वर आरसाळे यांच्याशी वारंवार संपर्क साधून रुग्णालयात उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र, ते रुग्णालयात उपस्थित झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालयाचे प्रमुख घटनास्थळी उपस्थित नसल्याने नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.





