गर्भवती महिलेला अमानुष वागणूक
| वाशिम | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा महिला रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर अमानुष वागणूक आणि हलगर्जीपणामुळे तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कुटुंबियांनी जबाबदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पालसखेड येथील शिवानी वैभव गव्हाणे यांना 2 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता प्रसूतीसाठी वाशिम जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सर्व काही सामान्य असल्याचे सांगितले आणि सकाळी 10 वाजेपर्यंत प्रसूती होईल, असे आश्वासन दिले. मात्र, शिवानी यांना रात्रीपासून तीव्र प्रसववेदना होत असताना आणि कुटुंबियांनी वारंवार विनंती करूनही, सकाळी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकेने त्यांची तपासणी केली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांचा दावा आहे की, शिवानीला प्रसूतीदरम्यान अमानुष वागणूक देण्यात आली. तिला थोबाडीत मारण्यात आले, पोटावर जबरदस्तीने दाब देण्यात आला आणि अयोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली, असे कुटुंबियांनी सांगितले. सायंकाळी साडेपाच वाजता प्रसूती झाली; परंतु, डॉक्टरांनी नवजात बालकाला हृदयाची धडधड नसल्याचे सांगितले आणि त्याला मृत घोषित केले.
यादरम्यान, शिवानी यांच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे बाळ गमावले. शिवानी तासन्तास वेदनांमध्ये तडफड होत होती. आम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांना विनवणी करत होतो, पण कोणीच ऐकले नाही. त्यामुळे दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेने स्थानिक समाजात संतापाची लाट पसरली असून, रुग्णालय प्रशासनावर तातडीने चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
