पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही; पुलाच्या कामाबद्दल संशय निर्माण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कोंडीवडे राज्यमार्गावर शिरसे येथील उल्हास नदीवर पुल व्हावा, ही अनेक वर्षांपासूनची स्थानिकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. हा नवीन पुल वापरास खुला झाला असला तरी पलीकडे जाण्यासाठीचा रस्ता तयार झालेला नाही. तसेच, या पुलावर असलेली उद्घाटनाची कोनशिला मात्र कोसळली आहे. त्यामुळे पुलाच्या कामाबद्दल संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, या पुलाच्या नेवाळी-आवळस भागाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना स्थानिक करीत आहेत.
उल्हास नदीवर कर्जत कोंडीवडे रस्त्यावर शिरसे आणि नेवाळी आवळस या गावांना जोडणारा पूल व्हावा, अशी अनेक वर्षे मागणी होती. आवळस नेवाळी येथून पुढे पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाता येते. या पुलामुळे शिरसे आकुर्लेपासून खांडपे भागातील रहिवाशांना पळसदरी स्थानकात पोहचण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. यापूर्वी उल्हास नदी असलेल्या मोहिली येथील पुलावरून आवळस येथे जावे लागत होते. मात्र, आता नवीन पुलामुळे आवळस नेवाळी ही गावे आणखी जवळ आली आहेत. शिरसे गावाला लागून उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे खोपोली या आद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र, आता पूल बांधण्यात आला असला तरी पुलाच्या पलीकडे जाणारा मार्ग बनविण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नवीन पुलाचा उपयोग शुन्य, अशी अशी स्थिती झाली आहे. आवळस नेवाळी भागातून पुलापर्यंत रस्ता बांधण्यात आल्यावर खऱ्या अर्थाने या नवीन पुलाचे महत्व स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या पुलाला जोडणारा रस्ता बनवावा, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.
पुलाच्या उद्घाटनाची कोनशिला कोलमडली
उल्हास नदीवरील शिरसे येथील पुलाची कोनशिला बनविण्यात आली होती. त्या कोनशिला पाटीवर स्थानिक आमदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांची नावे आहेत. मात्र, तीच कोनशिला कोलमडली आहे. त्यामुळे कोनशिला कोसळत असेल तर पुलाच्या कामाच्या दर्जाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरसे येथील पुलावरून पलीकडे जाणारा रस्ता तयार व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर प्रस्ताव तयार करून वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. कोनशिला पाटी ही पुलाचा भाग नसून पुलाच्या बाजूच्या जमिनीवर उभी करण्यात आली होती.
संजीव वानखेडे,
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग







