| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका विस्कळीत झाला आहे. नागरिक, दुकानदार, रस्त्यांवरील प्रवासी एवढंच नव्हे तर पोलिसही या पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी शिरले असून, पोलिसांना पाण्यात उभं राहून कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे.
यंदा दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीची दयनीय अवस्था समोर आली आहे. जुनी इमारत, आजूबाजूला झालेल्या विकासकामांतील अतिरेकी भराव आणि निचऱ्याचे मार्ग बंद झाल्यामुळे संपूर्ण परिसर दलदल स्वरूपाचा झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी ठाण्यात घुसत असून, कर्मचाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठी झाडे पाण्यात उभी असल्याने ती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही झाडे पडल्यास थेट जीवितास धोका संभवतो. पोलिसांसारखे 24 तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे रक्षकच आज असुरक्षित झाले आहेत, हीच खरी शोकांतिका आहे. आपलं रक्षण करणारेच जर पाण्यात उभे असतील, तर प्रशासन कुठं आहे? हे पाहण्यासाठी ही विशेष पथक लागणार आहे का? स्थानिकांकडून प्रशासनाला तातडीने लक्ष घालून न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचा परिसर सुरक्षित करण्याची जोरदार मागणी होत आहे.
न्हावा-शेवा पोलीस ठाणे पाण्यात
