चिंचघर खाडीत रात्रीचा खेळ

वाळू माफियांकडून दररात्री अवैध वाळू उपसा
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मंडणगड तालुक्यात वाळू माफीयांचा अवैध वाळू उपसण्याचा खेळ रात्रीच्या सुमारास सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. याप्रसंगी तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित प्रशासन यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील चिंचघर गावाच्या हद्दीत सावित्री नदी खाडीत गेल्या चार दिवसांपासून दररोज रात्री अवैध वाळू उपसा सुरू आहे. शहरात रात्रीच्यावेळी राजरोसपण फिरणारे डंपर याची साक्ष देत आहेत. सक्शनच्या मदतीने काढण्यात आलेली वाळू डंपरच्या मदतीने अगदी चढ्या भावाने पोहोचते केली जात आहे.

यापेक्षाही सर्वात मोठी आश्‍चर्याची बाब म्हणजे अशी की, देव्हारे व मंडणगड येथे पोलीस चेकनाके कार्यरत असतानाही स्थानिक महसूल व पोलिस प्रशासन यांचेकडून दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक संभ्रमित झाले असून प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का किंवा ते याप्रकरणी वाळू माफियांना सामिल आहेत? अशा विविध शंकाकुशकांना तोंड फुटले आहे. शासकीय यंत्रणा व खनिकर्म अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे व अवैधरीत्या सुरू असलेली वाळू चोरी व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करावी तसेच राजरोसपणे अवैध वाळू उपसा करून सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने वाळू विक्री करून लाखो रुपये गैरमार्गाने कमाविणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मागणी स्थानिक जनतेकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version