एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती

| उरण | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील शेलघर येथे प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे विजेत्यांना 21 बाईक असलेली क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. या स्पर्धेला भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी यांनी उपस्थित राहून एमजी ट्रॉफीला चार चांद लावले.

निलेश कुलकर्णी यांनी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बळी घेणारे ते पहिले भारतीय गोलंदाज ठरले. मुंबई संघाकडून खेळताना, त्यांनी बडोदा संघाचे 10 बळी अवघ्या 120 धावांत घेतले होते. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी एमजी ट्रॉफीला आलेले निलेश कुलकर्णी यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने शनिवारी (दि.28) स्वागत केले. त्यानंतर शाल आणि सन्मानचिन्ह देऊन महेंद्र घरत यांनी निलेश कुलकर्णी यांचा सन्मान केला.

यावेळी निलेश कुलकर्णी म्हणाले, ‘खेळ कोणताही असो, त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे. महेंद्र घरत यांच्या सौजन्याने आयोजित एमजी ट्रॉफीचे सामने आणि भव्य मैदान पाहून मनापासून आनंद झाला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्राथमिक सुविधा नसतानाही मी त्याकाळी क्रिकेटवर जिवापाड प्रेम करून खेळलो. तहानभूक माहित नसायची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवू शकलो. त्यामुळे आजही मी क्रिकेटची सेवा करत आहे, खेळाडूंना घडवत आहे.

Exit mobile version