रत्नागिरीमध्ये नऊ जिवंत गावठी बॉम्ब जप्त

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
वेंगुर्ले येथून रत्नागिरीत गावठी बॉम्ब विक्रीसाठी आलेल्या टोळीतील दोघांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ जिवंत गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. ते बॉम्बचे नमुने दाखविण्यासाठी रत्नागिरीत आले होते. पसंत पडल्यावर मोठा व्यवहार होणार होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
वेंगुर्ले येथील रामा सुरेश पालयेकर (22), श्रीकृष्ण केशव हळदणकर (26) हे दोघे वेंगुर्ले येथून दुचाकीने हातखंबा येथे आले होते. वेंगुर्लेतून दोन तरुण गावठी बॉम्ब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची माहिती जिल्हा दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हातखंबा येथे सापळा रचला होता.
सांयकाळच्या सुमारास पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्‍या एका दुचाकीला (एमएच- 07- एपी- 2700) पोलिसांनी थांबविले. परंतु, दुचाकी चालक पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत झडती घेतली. त्यांच्याकडे नऊ जिवंत गावठी बॉम्ब आढळले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून ते जिवंत बॉम्ब त्यांच्या ताब्यात दिले. या प्रकाराची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचानामा केला
पोलिस हवालदार उदय चांदणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी रामा पालयेकर, श्रीकृष्ण हळदणकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Exit mobile version