मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे निर्मला पाटील यांचा सत्कार

| अलिबाग | प्रतिनिधी |

मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीच्या सदस्य, श्रीगाव येथील आदर्श माता आणि भाजीविक्रेत्या निर्मला नारायण पाटील यांच्या 77 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (7 जुलै) कृतज्ञता म्हणून मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीच्यावतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीतर्फे या ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. त्यांच्याच हस्ते निर्मला पाटील यांचा पुष्पगुच्छ, मानपत्र, शाल, साडी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक उमाजी केळुसकर, या ग्रुपचे उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव जी.सी. पाटील, विकास द. पाटील, नितीन पाटील, रामचंद्र म्हात्रे, सुनील राऊत, सुरेश पाटील, वैकुंठ पाटील, आर.जे. पाटील, संदेश पाटील, संतान पाटील, रमेश पाटील, नंदकुमार राऊत, पांडुरंग पाटील आदी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. तसेच निर्मला पाटील यांचे सुपुत्र किशोर पाटील, राजेश पाटील, नात डॉ. श्रद्धा किशोर पाटील, नातू सिव्हिल इंजिनियर करण किशोर पाटील, सुना, इतर नातवंडे व समस्त पाटील कुटुंबिय, त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

याप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी अध्यक्षीय भाषणातून अतिशय कष्टातून वर आलेल्या आणि आपले कुटुंब घडविणार्‍या निर्मला मावशी मॉर्निंग वॉक ग्रुपला प्रेरणा देणार्‍या आहेत, त्यामुळे कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार केला असल्याचे सांगितले. ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या मनोगतातून निर्मला पाटील यांचा सन्मान केला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच केक कापून, औक्षण करुन त्यांचा 77 वा वाढदिवस साजरा केला. सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले.

Exit mobile version