सरकारी वकिलांनी मागितली वेळ
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार होती. परंतु विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी (7 रोजी) होणार आहे.
नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात (जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज दाखल करून घेत वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी सोमवारी होणार आहे.
शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच अपूर्ण दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिला आहे.