महामार्गाच्या निकृष्ट कामावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; नागोठणे उड्डाणपुलावर आंदोलन
| नागोठणे | प्रतिनिधी |
सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांनी व नेत्यांनी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी 17 वर्ष घालूनही तो पूर्णत्वास नेला नाही. महामार्गाचे झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘या रस्त्याच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते’ असे व्यक्तव्य करतात आणि राज्यातील मंत्री शिवेंद्रराजे भोसले केवळ आश्वासन देत असल्याने या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. उड्डाण पुलावर आयोजित आंदोलनात केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या आणि कथित निकृष्ट कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिरानगर, नागोठणे येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट उड्डाणपुलावरच आंदोलन करून सरकार आणि संबंधित यंत्रणेला धारेवर धरले. शुक्रवारी (दि.11) सकाळी 11 वाजता जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
या आंदोलनाला जिल्हा उपाध्यक्ष सज्जादभाई डावरे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीहर्ष कांबळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सदानंद येळवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अजयशेठ महाडिक, अलिबाग विधानसभा अध्यक्ष सचिन पाटील, विधानसभा सरचिटणीस साईनाथ म्हात्रे, माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर, जिल्हा महिला संघटक रिया रेडेकर, अनिता पवार व त्यांच्या महिला सहकारी, सुधागड तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, गोरेगाव शहर अध्यक्ष अस्लम भऊर, पोलादपूर विभागीय अध्यक्ष भावेश सलागरे, दहिवली विभाग अध्यक्ष सलाउद्दीन सणगे, रोहा तालुका युवक अध्यक्ष मुजाहिद मुजावर, गुड्डू पानसरे, राहील कडवेकर, मिर्जा कुटकी, आलम खान, असिफ शेख, वसीम कडवेकर, शबाब पेणकर, मुशीद कुरेशी आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
‘शंभर रुपयांचे काम दहा लाखांवर नेले!’
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या हितासाठी जवळच्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांना कामे देऊन वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. शंभर रुपयांचे काम दहा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले, त्यामुळे नेत्यांच्या तिजोऱ्या भरत गेल्या आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला, असा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामात ठेकेदार कंपन्यांनी नियुक्त केलेल्या अभियंत्यांच्या पात्रतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अभियंत्यांवरही गैरप्रकाराचे आरोप करत ‘या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी करा’, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
‘कोकणी माणसाला मिळतात फक्त आश्वासने!’
गणपती आणि शिमग्याच्या सणासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना वर्षानुवर्षे केवळ आश्वासनेच मिळत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असूनही सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
