सुवर्णा जोशी यांचा विश्वास
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत असून महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार नितीन सावंत यांनी कर्जत शहरात प्रचारात आघाडी घेतली आहे. कर्जत शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार नितीन सावंत यांना बहुमत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे, असा विश्वास शिवसेना महिला आघाडी संघटक सुवर्णा जोशी यांनी व्यक्त केला आहे.
कर्जत शहरात महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुवर्णा जोशी तसेच माजी शहर प्रमुख संतोष पाटील, शहर प्रमुख निलेश घरत, माजी शहर प्रमुख भालचंद्र जोशी आदींच्या नेतृत्वाखाली प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या पत्नी रसिका सावंत या आघाडीवर राहून कर्जत शहरातील घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. तसेच, कर्जत शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते देखील मशाल चिन्हाचा प्रचार करीत आहेत. प्रचाराची धुरा वाहणार्या महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी आणि रेखा ठाकरे यांनी आघाडीवर राहून कर्जत शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना आघाडी मिळवून देण्यासाठी चंग बांधला आहे. प्रचारात मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग उतरला असल्याने कर्जत शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवरच राहतील, असा विश्वास जोशी व्यक्त करीत आहेत.