निवी परिसर होणार ‌‘पाणीदार’

दीपक फाऊंडेशनच्या पुढाकारातून पाणलोट बंधाऱ्यांची उभारणी

| रोहा | प्रतिनिधी |

दीपक नायट्रेट कंपनी संचलित दीपक फाऊंडेशनच्या माध्यमातून रोहा तालुक्यात जलसंधारणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, वरसे ग्रामपंचायत हद्दीतील निवी गाव परिसरात लोकसहभागातून पाणलोट बंधाऱ्यांची उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक ओहळांवर तब्बल पाच ठिकाणी पक्क्या बांधकामाचे बंधारे उभारले जात असल्याने परिसरातील भूजल पातळी वाढून संपूर्ण भाग ‌‘पाणीदार’ होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

‌‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जमिनीतील नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित होण्यास मदत होणार आहे. परिसरातील पाणीसाठा टिकून राहावा, शेतीला पूरक वातावरण निर्माण व्हावे आणि गाव सुजलाम्-सुफलाम्‌‍‍ व्हावे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे दीपक फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम यांनी सांगितले. या पाणलोट बंधाऱ्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपक फाऊंडेशनच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. “निवी परिसरातील नैसर्गिक ओहळांवर उभारले जाणारे बंधारे भविष्यात जलसंपन्नतेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. लोकसहभागातून उभी राहत असलेली ही जलसमृद्धी सुखावणारी आहे,” अशी प्रतिक्रिया माजी सरपंच अमित मोहिते यांनी दिली.

दीपक फाऊंडेशनच्या माध्यमातून निवी, तळाघर आणि परिसरातील विविध गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी मार्गदर्शन, शिबिरे तसेच शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. शेतकऱ्यांना पूरक साहित्य, बी-बियाणे आणि कृषीविषयक मार्गदर्शन देण्यातही फाऊंडेशनचा पुढाकार राहिला आहे. तसेच शाळांमध्ये विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटपही करण्यात आले आहे. यावेळी प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम यांच्यासह ग्रामस्थ प्रशांत राऊत, राजेंद्र जाधव, संतोष बामुगडे, पप्पू राऊत, निरीक्षक प्रतिक मारणे, ठेकेदार तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version