चाणजे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईचा बोजवारा?

वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात

| उरण | प्रतिनिधी |

चाणजे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारप्रकरणी तक्रार होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटत आला, तरी अद्याप संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणात ग्रामस्थ सचिन रमेश डाऊर यांनी ग्रामनिधी, पाणीपुरवठा, साहित्य खरेदी, टँकर बिल, सौरऊर्जा दिवे, घनकचरा प्रकल्प आणि विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. चौकशीदरम्यान गंभीर अनियमितता समोर आल्याने तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही सरपंच आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे “या भ्रष्टाचारातील लाखोंच्या मलिद्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही वाटा असल्यानेच कारवाईला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे का?” असा संशय आता तक्रारदाराने व्यक्त केला आहे.

तक्रारदाराच्या मते, प्रथमदर्शनीच अनेक व्यवहार संशयास्पद दिसत असून, बाजार भावापेक्षा 300 ते 500 टक्के जास्त दराने साहित्य खरेदी, नियमबाह्य बिले, ग्रामसभेची मंजुरी नसलेली कामे आणि कागदोपत्री विकासकामांचा मोठा घोटाळा झाला आहे. तरीदेखील संबंधित अधिकारी कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जनतेचा पैसा लुटून भ्रष्ट मंडळी मोकाट फिरत आहेत आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता चाणजे ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version