| रेवदंडा | प्रतिनिधी |
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) सोबत युती न करण्याचा ठाम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केला आहे. भाजपसोबत मात्र चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून त्यांनी रायगडच्या राजकीय पटावर नवा वाद निर्माण केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वय न झाल्याने अनेक ठिकाणी घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात थेट रिंगणात उतरले होते. महाड येथे हा वाद हाणामारीपर्यंत गेला, तर खोपोली येथे राजकीय संघर्षातून शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना तटकरे यांची ही भूमिका महायुतीतील फूट अधिक स्पष्ट करते आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना खासदार तटकरे यांनी, शिंदे गटाशी युती करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसोबत चर्चा सुरू असून ती सकारात्मक दिशेने होत असल्याचे सांगितले. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 5 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात राष्ट्रवादी-भाजपची जोडी विरुद्ध शिंदे गटाचा थेट लढा अपेक्षित आहे. या युतीबाबतच्या तटकरे यांच्या स्पष्ट वक्तव्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, आगामी दिवसांत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्या केंद्रस्थानी असतील. तटकरे यांच्या भूमिकेमुळे रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आल्याने सर्वच डोळे निवडणुकीवर खिळले आहेत.
शिंदे गटाशी युती नकोच; सुनील तटकरे यांचे स्पष्ट संकेत
