‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

शिक्षण विभागाचा रायन स्कूलला दणका


| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नववी उत्तीर्ण होऊन दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ‌‘टीन कॅम्प‌’च्या नावाखाली शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीची पंचायत समिती पनवेलच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. खांदा कॉलनी येथील रायन इंटरनॅशनल स्कूलला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहल, टीन कॅम्प अथवा तत्सम उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.


परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी 6 एप्रिल 2026 रोजी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने शाळेला पत्र देत संबंधित शासन निर्णयातील तरतुदींची आठवण करून दिली. शैक्षणिक सहल किंवा कॅम्प आयोजित करता येतो; मात्र विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्यासाठी सक्ती करता येत नाही, अशी भूमिका शिक्षण विभागाने स्पष्ट केली आहे.

तक्रारीनुसार, दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना ‌‘टीन कॅम्प‌’मध्ये सहभागी होण्यासाठी शुल्क भरण्यास सांगितले जात असून, काही विद्यार्थ्यांवर व पालकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरणे शक्य नसलेल्या पालकांसमोर त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गुणांशी संबंध जोडल्याचा आरोप
तक्रारीत दहावीच्या गुणांशी संबंधित गंभीर आरोपही करण्यात आला आहे. ‌‘टीन कॅम्प‌’मध्ये सहभागी न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेकडून मिळणारे 20 गुण मिळणार नाहीत, अशा प्रकारची सक्ती केली जात असल्याचा आरोप आहे. शैक्षणिक गुणांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना सहलीसाठी प्रवृत्त करणे योग्य आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
शासन निर्णयाचा दाखला
गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी पाठवलेल्या पत्रात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 20 मे 2017 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. सहलीसाठी विद्यार्थी व पालकांची संमती आवश्यक असून, कोणत्याही विद्यार्थ्यावर सक्ती करता येणार नसल्याचे या निर्णयातील तरतुदींवरून स्पष्ट होते. शुल्क भरणे किंवा कॅम्पमध्ये सहभागी होणे यासाठी विद्यार्थ्यांवर अथवा पालकांवर आर्थिक किंवा शैक्षणिक दबाव टाकू नये, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, रायन इंटरनॅशनल स्कूल प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
Exit mobile version