कुंभे धरणासह धबधब्यावर ‌‘नो एंट्री’

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील कुंभे धरणासह धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश 29 सप्टेंबरपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगाम सुरु आहे. या पावसामुळे अनेक धरणे पाण्याने भरले आहेत. धबधब्यांमध्येही पाणीही वाढले आहे. माणगाव परिसरातील कुंभे केळगण घाट, कुंभे धरण आणि बोगदा हे पावसाळी हंगामात पर्यटनाच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. पुणे, मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील राज्यातील पर्यटक या धरणांसह धबधब्यांजवळ फिरण्यासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी या परिसरात होते. कुंभे धरण आणि धबधबा हे निसर्गाच्या सानिध्यात असून दुर्गम भागात आहे. त्यामुळे त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव आहे. सेल्फी काढण्याबरोबरच पाण्यात मौजमजा करण्याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे घेतात.

कुंभे घाट हा धोकादायक वळणाचा व तीव्र उताराचा आहे. त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवीतहानीचा धोका टाळण्यासाठी माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी धरण, धबधबा परिसरात मनाई आदेश दिले आहेत. धरण, धबधबा व तलावाच्या एक किलोमीटर परिसरात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेशबंदी आहे. याची नागरिकांची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. संदीपान सानप यांनी केले आहे.

Exit mobile version