गणेशोत्सवाच्या गर्दीला रोखण्यासाठी रायगड पोलिसांची तयारी
| रायगड । प्रमोद जाधव ।
गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने तळ कोकणात दाखल होणार असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढणार आहे. ही गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील इंदापूर-माणगाव येथे चार ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ घोषित केले असून, वाहतूक कोंडी झाल्यास वाहनांना वळविण्यासाठी आठ ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
रायगड जिल्ह्यासह कोकणात 14 सप्टेंबरपासून 25 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोकणात साधारणतः साडेतीन लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एक लाख पाच हजार 345 गणेशमूर्तींचा समावेश आहे. त्यात दीड दिवसांपासून सहा दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत 99 हजार 366 गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत.
25 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात राहणारे गणेशभक्त आपल्या मूळ गावी तळ कोकणात जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून हा प्रवास होणार आहे. जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 तसेच पाली फाटा (खोपोली)-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-(अ) या महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ राहणार आहे.
हजारो वाहने रस्त्यावर धावणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता आहे. इंदापूर आणि माणगावमधील बाजारपेठेजवळ वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासोबतच ती रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी नो पार्किंग झोनची घोषणा केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील माणगाव येथील रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील माही हॉटेल ते कशेने बायपास मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत.
असे असतील पर्यायी मार्ग
पेण : तरणखोप-पेण बायपास-गागोदे-वरसई-पालीफाटा-परळी-जांभूळपाडा-पाली-वाकण.
वडखळ : वडखळ-पोयनाड-पेझारी-चेकपोस्ट-कुर्डूस-नागोठणे-वाकण.
नागोठणे : नागोठणे-वेलशेतफाटा-वरवठणे-भिसेखिंड-वाकण तसेच नागोठणे-वेलशेतफाटा-वरवठणे-भिसेखिंड-रोहा-वाकण.
वाकण-नागोठणे : वाकण-पाली-नांदगांव-विळे-सुतारवाडी-कोलाड तसेच वाकण-पाली-नांदगांव-विळे-निजामपूर-माणगांव आणि वाकण-पाली-नांदगांव-विळे-निजामपूर-माल्याची वाडी-बोरवाडी-जांभूळवाडी-ढालघर.
कोलाड : कोलाड-सुतारवाडी-विळे-निजामपूर-माणगांव.
माणगाव : माणगांव-निजामपूर नाका-साईराम हॉटेल ब्रिज-मुगवली ब्रिज.
लोणेरे : लोणेरे-गोरेगाव-नांदवी-आंबेत-म्हाप्रळ.
राजेवाडी फाटा : पुढे पोलादपूरकडे वाहतूक कोंडी झाल्यास टोळफाटा (महाड)-आंबेत-म्हाप्रळ. या वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी 26 सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
