| रसायनी | वार्ताहर |
आधुनिक युगात स्वतःबरोबर जगाची प्रगती करायची असेल तर शिक्षण घ्या, त्याचा प्रसार करून आपल्या ज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी करा, असे आवाहन देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.
खालापूर तालुका देशमुख मराठा मंडळाच्या वतीने शैक्षिणक गुणवत्ता प्राप्त करणारे गुणवान विद्यार्थी आणि विविध कार्य क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ चंद्र विलास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रभाकर देशमुख बोलत होते. तालुका शिक्षण मंडळाचे पदसिद्ध कार्यवाह प्रदीप देशमुख यांना मुख्याध्यापकपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार उल्हासराव देशमुख यांनी केला. गुणवंत विद्यार्थी यांचाही सत्कार प्रभाकर देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खालापूर तालुका देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख होते. मनाली देशमुख चार्टर्ड अकाऊंट व मयुरी देशमुख कंपनी संचालक यांनी सत्काराला उत्तर देताना प्रोत्साहन किती महत्त्वाचे आहे हे आपल्या भाषणातून सांगितले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, मान्यवर लेखकांची पुस्तके, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक मंडळाचे माजी उपाध्यक्ष हरेश काळे, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, उपाध्यक्ष सुभाषराव देशमुख, गुलाबराव देशमुख, जितेंद्र देशमुख, सचिव दिलीप देशमुख, विनायक देशमुख, रमेश देशमुख, भरत देशमुख, शशिकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.