भाजपाची जन आशिर्वाद नव्हे तर जन अपमान यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचे टिकास्त्र
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मोदी सरकारला दुसर्‍यांदा जनतेने बहुमत दिल्यानंतर लोकांची अपेक्षा होती जिव्हाळयाचे प्रश्‍न मार्गी लागतील जिवन सुखकर होईल कमी खर्चात जिवन चालवू अशी अपेक्षा भारतातल्या नागरिकांना होती. मोदी सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार केल्यानंतर लोकांमध्ये नव्याने मंत्र्याना पाठवून लोकांचे आशिर्वाद घ्या असे सांगण्यात आले. मात्र कुठल्याच अपेक्षा पुर्ण न करणार्‍या या मोदी सरकारच्या मंत्र्यांनी सुरु केलेली ही जनआशिर्वाद यात्रा नव्हे तर जन अपमान यात्रा आहे. भारतवासीयांनी दिलेल्या बहुमताचा अपमान करण्याचे कारस्थान मोदी सरकारने केले आहे. म्हणून ही जन अपमान यात्राच आहे. अनेक मुद्यांवर विफल झालेले मोदी सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी यात्रा काढत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप महेश तपासे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे आदी उपस्थित होते.
महेश तपासे पुढे म्हणाले की, मोदी सरकारला कोरोनाशी काहीही देणेघेणे नाही. देशात कोरोनाची परिस्थीती निर्माण झाली. पहिली लाट येऊ पहात असतानाच नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेण्यात आला. निवडणूकांचे वारे वाहू लागले. भाजपाचे मोठे मोठे नेते प्रचारसभा घेत पळापळ करु लागले तेंव्हा दुसरी लाट आली. आणि आता जनआशिर्वाद यात्रेमुळे परत एकदा आपण तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत हे मी सांगत नाही तर आरोग्या संदर्भातील राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीने दिलेल्या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की देश तिसर्‍या लाटेच्या उंबरठयावर आहे. तरी देखील जनआशिर्वाद यात्रा काढून या लाटेला भाजपा आमंत्रण देत असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला. जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये खोटे सांगितले जात आहे. जे काम केलेच नाही त्याची खोटी प्रसिद्धी घ्यायची, कुठेतरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, मतांची विभागणी करायची आणि राजकारणाची भाकरी भाजून घ्यायची. लोकांचे प्रश्‍न सोडवायचेच नाही हे मोदी सरकारचे काम आहे. हे पितळ उघडे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जन आशिर्वाद यात्रेचा पोलखोल करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

Exit mobile version