कार्यकर्त्यांपेक्षा अलिशान गाड्यांचीच गर्दी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. रायगडात काढण्यात आलेल्या या जनआशिर्वाद यात्रेला अलिबाग येथून शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेृत्वाखालील या जन आशीर्वाद यात्रेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ही यात्रा चेष्टेचा विषय बनली होती. कार्यकर्त्यांपेक्षा यात्रेत मागून येणार्या गाड्यांच्या ताफ्यातील आलिशान गाड्याच मोठया संख्येने दिसत होत्या. विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, आमदार पाटील आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची जिल्ह्यातील संख्या पाहता जिल्ह्यातील भाजपा नेतृत्वाने मच्छीमार, प्रकल्पग्रस्त यांच्या भेटीचे आयोजन करुन गर्दी करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र भाजपा कार्यकर्ते आणि इतर मच्छिमार, प्रकल्पग्रस्त यांच्यातील फरक लक्षात येत असल्याने हा प्रयत्न फसल्याचे स्पष्ट दिसत होते. तुषार अतिथी गृहापासून निघालेली ही जनआशिर्वाद यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत भाग्यलक्ष्मी हॉल येथे पोहोचली. त्यानंतर प्रकल्पग्रस्त संवाद सभा पार पडली. चरी येथे प्रकल्पगस्तांचा मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.