केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतराचे तिनतेरा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रकल्पग्रस्त संवाद सभेत कोरोना नियमांना हरताळ फासत सुरक्षित अंतराचे तिनतेरा उडाल्याचे निदर्शनास आले. एक हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थि असल्याने आता जिल्हा प्रशासनान काय कारवाई करणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार 15 ऑगस्टपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुरुड रोहा प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादन भुमीपूत्र शेतकरी, मच्छिमार संवाद सभा अलिबाग चेंढरे भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये घेण्यात आला. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदी मेळाव्याला उपस्थितीत होते. मात्र मेळाव्यात उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्तांची गर्दी पाहता कोरोना गेला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मेळाव्यात कुठेही सुरक्षित अंतर नियमाचे पालन झालेले नाही. त्यामुळे अन लॉक झालेला जिल्हा पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाच्या त्रिसूत्री नियमाचे पालन करण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, हात सॅनिटायझरने स्वच्छ करा अशा सूचना केल्या जातात. गर्दी टाळा असेही आवाहन केले जाते. मात्र या नियमाची पायमल्ली चक्क केंद्रीय मंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते याच्या उपस्थितीत केली जात आहे.
सर्व सामान्य नागरिकांना नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याबर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र राजकीय मेळावे, यात्रा, आंदोलने ही सर्रास सुरू असल्याने यावेळी कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन होत नाही का असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारत आहेत. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी भाजपची जन आशीर्वाद यात्रा राज्यात सुरू झाली आहे. मात्र आशीर्वाद घेताना याच जनतेला भाजप पुन्हा कोरोनाच्या खाईत लोटले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.