अतिवृष्टीलाच टाळेबंदी; लॉकडाऊनमुळे व्यापारी नाराज


अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन
जिल्ह्यात 317 कुटुंबांचे स्थलांतर
24 तासात 79 मिलीमीटर पावसाची नोंद

नुसता इशाराच
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
हवामान खात्याच्या दि. 9 ते 12 जूनदरम्यान होणार्‍या अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले. प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून सतर्कता बाळगत आधीच लॉकडाऊन असणार्‍या जिल्ह्यात दोन दिवस कडक निर्बंध लादले खरे; पण तसा पाऊस झाला का? आधीच लॉकडाऊनने त्रस्त असलेले नागरिक आणि व्यापारी वर्गात जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे संताप व्यक्त झाला. अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर दिवसभर पडलेल्या कडकडीत उन्हामुळे अतिवृष्टीलाही टाळेबंदीचा फटका बसल्याच्या चर्चेला जिल्हाभरात उधाण आले होते.


गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या घटनांची नोंद झाली. पहिल्याच पावसात नद्या, नाले दुथडी भरून वाहण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यात श्रीवर्धन येथे रोहिदास आळीत जयवंत एटम यांच्या घरावर दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, सकाळनंतर बर्‍याच भागात कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे लागू केलेल्या दोन दिवसांच्या कडकडीत लॉकडाऊनचा काही उपयोग झाला नसल्याने व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी तर व्यापार्‍यांनी लॉकडाऊन झुगारुन देत सर्व व्यवहार सुरु ठेवले होते.


रायगड जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टी असल्याने मुसळधार पावसाने भूसखलन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 103 गावे ही दरडग्रस्त भागात आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील 73 कुटुंबातील 309, कर्जत 7 कुटुंबातील 48, खालापूर 28 कुटुंबातील 102, महाड 164 कुटुंबातील 525, पोलादपूर 23 कुटुंबातील 68, म्हसळा 19 कुटुंबातील 47, श्रीवर्धन मधील 40 जणांना, असे 314 कुटुंबांतील 1 हजार 139 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, धोकादायक घरातील 15 कुटुंबांतील 111 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.


जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 79 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग- 80 मि.मी, पेण – 80 मि.मी, मुरूड- 69 मि.मी, पनवेल – 160.40 मि.मी, उरण – 111 मि.मी, कर्जत – 79.50 मि.मी, खालापूर – 69 मि.मी, माणगाव – 39 मि.मी, रोहा – 97 मि.मी, सुधागड – 84 मि.मी, तळा – 67 मि.मी, महाड – 36 मि.मी, पोलादपूर – 35 मि.मी, म्हसळा – 54 मि.मी, श्रीवर्धन – 87 मि.मी, माथेरान- 122.20 मि.मी पाऊस पडला. दरम्यान येत्या 24 तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य 20 दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे स्थलांतरण सुरू करण्यात आले आहे. तर, नदी किनार्‍यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी समुद्र आणि नदीकिनार्‍यावर पोहण्यास जाऊ नये, धबधब्यांच्या ठिकाणी वर्षासहलीस जाऊ नये, घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले. आपत्कालीन परिस्थितीत 02141-222118 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवाच सुरु
10 आणि 11 असे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि वारे वाहणार असल्याने दोन दिवस जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. वैद्यकीय सेवेतील रुग्णालये, मेडिकल, पॅथालॉजी सुरू राहणार आहेत. मात्र, अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले.

Exit mobile version